हिंदू देवतांचा अपमान: मुनव्वर फारुकी ला अंतरिम जामीन
 

हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कॉमेडियन मुनव्वर फारुकी ह्याला आज सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन दिला आहे.

 

मुनव्वर फारुकी ह्याने इंदूर मधील एका कार्यक्रमात हिंदू देवी देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्यानंतर त्याला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. त्याचा जामीन अर्ज मध्य प्रदेश हाय कोर्टाने फेटाळून लावला होता

 
ह्यानंतर फारुकी ने सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. फारुकी ला अटक करताना २०१४ च्या अरणेश कुमार वि. बिहार ह्या निकालात मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नव्हते आणि CrPC मधील कलम ४१ चे ही पालन झाले नव्हते असे कारण देत सुप्रीम कोर्टाने हा अंतरिम जामीन दिला. कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला नोटीस बजावून फारुकी च्या जामीन अर्जावर त्यांचे उत्तर मागवले आहे. हा अंतरिम जमीन म्हणजे जामीन अर्जावर निर्णय होईपर्यंत दिलेले संरक्षण असते.
 

दरम्यान फारुकी ह्याने मे २०२० मध्ये केलेल्या अशाच एका स्टँड अप कॉमेडी शो मध्ये हिंदू देवतांचा अपमान केल्याबद्दल उत्तर प्रदेशातही त्याच्यावर खटला दाखल झाला होता. ह्या खटल्यात त्याला हजार करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने काढलेल्या वॉरंट ला देखील आज सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

 
अरणेश कुमार मधील मार्गदर्शक तत्वे काय आहेत?
 

फारुकी ला जामीन देताना कोर्टाने ह्या निकालाचा उल्लेख केला आहे. ह्या निकालानुसार कमी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात पोलिसांनी खात्री न करता केवळ यांत्रिकपणे आरोपीला अटक करू नये असे निर्देश दिलेले आहेत. ७ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये केवळ तक्रार दाखल झाली म्हणून चौकशी न करता अटक केली जाऊ नये असे ह्या निकालात म्हंटले आहे.

One thought on “हिंदू देवतांचा अपमान: मुनव्वर फारुकी ला अंतरिम जामीन

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!