मुंबई: बहुचर्चित शीना बोरा खून खटल्याची सुनावणी मार्च २०२० नंतर बुधवारी पुन्हा सुरू झाली. कोरोना महामारींमुळे मार्च २०२० पासून ह्या खटल्याची सुनावणी थांबली होती. बुधवारी ६७ व्या साक्षीदाराची साक्ष कोर्टात पूर्ण झाली.
हा ६७ वा साक्षीदार हस्ताक्षर चिकित्सक असून त्याने आपल्या साक्षीत शीना बोराच्या नावाने पाठवल्या गेलेल्या राजीनाम्यावरची सही शीना ची नसल्याचे सांगितले. त्याच्या मते ही सही इंद्राणी मुखर्जीच्या असिस्टंट च्या अक्षराशी मिळतीजुळती आहे.
आता पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी ला होणार आहे.
काय आहे शीना बोरा खून प्रकरण?
मीडिया क्षेत्रातील मोठे उद्योगपती पीटर मुखर्जी ह्यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हीची आधीच्या लग्नापासून असलेली मुलगी शीना हिचा २४ एप्रिल २०१२ ला खून झाल्याचे उघडकीस आले. तिचा मृतदेह पेण - खोपोली रस्त्यावर एका निर्मनुष्य ठिकाणी सापडला. हा खून इंद्राणी हिनेच आपला एक पूर्वाश्रमीचा नवरा संजीव खन्ना, ड्रायव्हर श्यामवर राय आणि नवरा पीटर मुखर्जी ह्या सर्वांबरोबर कट रचून केला असे सीबीआय च्या तपासात समोर आले. ह्या प्रकरणाने देशभर खळबळ उडवून दिली होती.
इंद्राणी मुखर्जी ह्या प्रकरणात तुरुंगात असून पीटर जामिनावर बाहेर आहे. ह्या दोघांनी ह्या दरम्यान घटस्फोट देखील घेतला. इंद्राणी च्या जामीन अर्जावर मुंबई हाय कोर्टात २२ फेब्रुवारी ला सुनावणी होणार आहे.