कोण होते सुप्रीम कोर्टाचे सर्वात पहिले न्यायमूर्ती? वाचा सविस्तर
 

आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा ७१ वा वर्धापनदिन. २६ जानेवारी १९५० ह्या दिवशी राज्यघटना लागू झाली आणि सुप्रीम कोर्ट अस्तित्वात आले परंतु त्याचे कामकाज २८ जानेवारी १९५० पासून सुरू झाले. एका छोटेखानी सोहळ्यात सुप्रीम कोर्टाचे उद्घाटन करण्यात आले.

 

त्यापूर्वी भारतात ब्रिटिशांनी स्थापन केलेले फेडरल कोर्ट कार्यरत होते.

 

सुप्रीम कोर्टात सगळ्यात पहिल्यांदा फक्त ६ न्यायमूर्ती नेमले गेले होते. ह्यापैकी एक सरन्यायाधीश होते.

 

कोण होते हे ६ न्यायमूर्ती?

 

न्या. हरीलाल जयकिसनदास काणिया

Justice H. J. Kania

मूळचे सुरत चे असलेले न्या काणिया भारताचे पहिले सरन्यायाधीश. त्यांचे लॉ चे शिक्षण मुंबई च्या गवर्नमेंट लॉ कॉलेज मध्ये झाले. त्यांनी दिलेल्या निकालांपैकी ए. के. गोपालन वि. भारताचे संघराज्य हा निकाल चांगलाच गाजला.

सरन्यायाधीश पदावर कार्यरत असतानाच त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

 

न्या. पतंजली शास्त्री

 

Justice patanjali sastri

मूळचे मद्रास चे असलेले न्या. शास्त्री हे सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या ६ न्यायमूर्तींपैकी एक. ते पुढे ७ नोव्हेंबर १९५१ ला भारताचे दुसरे सरन्यायाधीश झाले.

त्यांनी दिलेल्या निकालांपैकी रमेश थापर वि. मद्रास राज्य, शंकरी प्रसाद वि. भारताचे संघराज्य हे निकाल गाजले.

 

न्या. मेहर चंद महाजन

 

Justice Mehr chand mahajan

न्या. महाजन ह्यांची वकिली प्रॅक्टिस आत्ता पाकिस्तानात गेलेल्या लाहोर मधली. स्वातंत्र्यपूर्व काळात ते जम्मू काश्मीर चे पंतप्रधान म्हणूनही नेमले गेले. भारत आणि पाकिस्तान च्या सीमा निश्चित करणाऱ्या Radcliffe आयोगावर काँग्रेस तर्फे न्या. महाजन नियुक्त झाले. सुप्रीम कोर्ट अस्तित्वात आल्यावर पहिल्या ६ न्यायमूर्तींपैकी ते एक झाले आणि नंतर ४ जानेवारी १९५४ ला ते भारताचे तिसरे सरन्यायाधीश झाले.

 

न्या बिजन कुमार मुखर्जी

 

Justice Bijan kumar mukherjea  

न्या मुखर्जी मूळचे कलकत्ता शहरातले. न्या. पतंजली शास्त्री ह्यांच्या निवृत्तीनंतर मुखर्जींनी सरन्यायाधीश व्हावे असा पंडित नेहरूंनी आग्रह धरला. परंतु आपल्यापेक्षा न्या. महाजन वरिष्ठ असल्याने त्यांनीच सरन्यायाधीश व्हावे अशी भूमिका मुखर्जी ह्यांनी घेतली. नेहरूंनी पुन्हा पुन्हा आग्रह केल्यावर आपण आपल्या वरिष्ठ न्यायमूर्तींनी डावलण्यापेक्षा राजीनामा देणे पसंत करू असे त्यांनी ठामपणे सांगत आपला बाणेदारपणा आणि नीतिमत्तेचे दर्शन घडवले. पुढे ते भारताचे चौथे सरन्यायाधीश झाले.

 

न्या. सुधी रंजन दास

 

Justice S R Das

मूळचे कलकत्ता शहरातले न्या. दास हे रवींद्रनाथ टागोर ह्यांचे शिष्य. त्यांनी कलकत्ता येथे वकिली केली आणि पुढे कलकत्ता हाय कोर्टाचे न्यायमूर्ती झाले. सुप्रीम कोर्ट अस्तित्वात आल्यावर त्यांची पहिल्या सहा न्यायमूर्तींमध्ये नेमणूक झाली. ते १ फेब्रुवारी १९५६ ला भारताचे पाचवे सरन्यायाधीश झाले.

 

न्या. सईद फझल अली

बिहार मधल्या जमीनदार कुटुंबातून आलेले न्या. फझल अली २६ जानेवारी १९५० ते ३० मे १९५२ ह्या काळात सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती राहिले. त्यांनी निवृत्तीनंतर आसाम आणि ओडिसा ह्या राज्यांचे राज्यपाल पदही सांभाळले. त्यांना पुढे भारत सरकारच्या पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 
अशाच माहितीसाठी #LawMarathi ला फॉलो करत रहा.
 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!