प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय? का साजरा करतात हा दिवस?- वाचा

आपण सगळे आज भारताचा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत. दर वर्षी २६ जानेवारी ला हा दिवस आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. दूरदर्शन वर दिल्लीत होणारी परेड बघतो. देशभर वेगवेगळे कार्यक्रम होतात. हा प्रजासत्ताक दिवस म्हणजे नेमकं आहे तरी काय? चला समजून घेऊया.

 

पूर्वीच्या काळी देश, राज्य ह्यांच्यच्यावर एखाद्या राजघराण्याचा हक्क असायचा. राजा का बेटा राजा बनेगा ही तेव्हाची ठरलेली पद्धत होती. हे राज्य किंवा देश त्या एका राजाची किंवा त्याच्या खानदानाची मालमत्ता असायचं. अमुक राजाचं राज्य म्हणूनच ते ओळखलं जायचं.

 

अशी राजेशाही अगदी अजूनही इंग्लंड सारख्या देशांमध्ये आहे. ह्या राजेशाहीविरुद्ध जगात उठाव झाले आणि लोकांनी 'राजा का बेटा राजा नाही बनेगा' हे ठरवून एक नवीन व्यवस्था स्वीकारली.

 

ही व्यवस्था म्हणजे प्रजासत्ताक. अगदी पूर्वी रोम मध्ये ही व्यवस्था होती. पण नंतर तिथेही मोठे मोठे राजे आले आणि मग राजेशाही.

 

प्रजासत्ताक म्हणजे काय?

प्रजासत्ताक म्हणजे लोकांचं राज्य. ज्या देशात तिथलं सर्वोच्च पद, तिथला राष्ट्रप्रमुख कोणीही नागरिक होऊ शकतो तो देश प्रजासत्ताक असतो. म्हणजेच आपल्या भारतात तुम्ही, आम्ही कोणीही सर्वसामान्य नागरिक राष्ट्रपती होऊ शकतो. हे पद फक्त एका कुटुंबातल्या किंवा वांशातल्या लोकांसाठीच राखीव नाहीये. म्हणून भारत प्रजासत्ताक. त्याउलट इंग्लंड मध्ये सर्वोच्च पद हे फक्त एका कुटुंबातल्या लोकांसाठीच आहे. आत्ता तिथे एलिझाबेथ २ ही राणी राज्य करतेय. त्याआधी तिचे वडील इंग्लंड चे राजा होते. तीच्यानंतर तिचा मुलगा इंग्लंड चा राजा होईल. असे भारतात होत नाही. राम नाथ कोविंद हे आपले राष्ट्रपती एक सामान्य नागरिकच होते. म्हणजेच जिथे देशातले सर्वोच्च पद सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले असते ती व्यवस्था प्रजासत्ताक व्यवस्था असते.

 

मग लोकशाही म्हणजे काय?

लोकशाही म्हणजे ज्या व्यवस्थेत देशातले लोक सगळे निर्णय घेतात. पण भारतासारख्या मोठ्या देशात सगळे निर्णय लोकांनी प्रत्यक्ष एकत्र येऊन, मतदान करून घेणं शक्य नाही. त्यामुळे आपण आपले प्रतिनिधी निवडतो आणि हे प्रतिनिधी सगळे निर्णय घेतात. ही असते प्रातिनिधिक लोकशाही. लोकांनी देश चाळवण्याविषयी सगळे निर्णय घेण्यासाठी आपले प्रतिनिधी निवडून देणं म्हणजे लोकशाही. आपला भारत देश लोकशाही आणि प्रजासत्ताक असा दोन्ही आहे. कारण आपल्याकडे कोणीही सामान्य नागरिक राष्ट्रपती पदावर नेमला जाऊ शकतो. आणि आपण आपले सरकार आपल्यासारख्याच लोकांमधून मतदान करून निवडतो.

 

आपण प्रजासत्ताक दिवस का साजरा करतो?

२६ जानेवारी १९५० ह्या दिवशी आपली राज्यघटना म्हणजेच संविधान देशात लागू झाले. आपण १५ ऑगस्ट १९४७ स्वतंत्र झालो पण आपले संविधान तयार झालेले नव्हते त्यामुळे ब्रिटिशांच्या कायद्यावर देशाची व्यवस्था सुरू होती. पण २६ जानेवारी १९५० ला आपले संविधान लागू झाले आणि आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र लोकशाही, प्रजासत्ताक देश झालो. म्हणून हा दिवस आपण दर वर्षी प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. जर संविधान लागू झाले नसतं, आपण प्रजासत्ताक देश असावं असं आपल्या घटनाकर्त्यांनी ठरवलं नसतं तर कदाचित आज आपल्याकडे पुन्हा एकदा राजेशाही असली असती. आपण निवडणुका लढवू शकलो नसतो किंवा मतदानही करू शकलो नसतो. म्हणून ह्या दिवसाचं महत्त्व आहे.

 

चला तर मग आपण सगळे आपला हा राष्ट्रीय सण जोशात साजरा करूया आणि भारताचे प्रजासत्ताक चिरायू होवो अशी प्रार्थना करूया.

 

जय हिंद!

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!