महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि समीक्षा यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम ही संस्था गेली ११० वर्षे करते आहे. साहित्य संमेलन व त्यानुषंगाने मराठी साहित्य परिषद ही शिखर संस्था नेहमी चर्चेत असते. यंदा महाराष्ट्र साहित्य परिषद चर्चेत येण्यास निमित्त आहे त्यांच्या निवडणुकांचे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या निवडणुका जानेवारी 2016 मध्ये झाल्या होत्या. जानेवारी 2021 मध्ये कार्यकारिणीची मुदत संपते आहे. कोरोंनाच्या निमित्ताने निवडणूकऐवजी थेट मुदतवाढ मिळवून घेण्याचा इरादा असल्याचे आरोप केले जात आहेत. ही माहिती समोर आली पराग करंदीकर यांनी लिहीलेल्या लेखातून.
कोरोनाचे कारण देऊन सध्याची कार्यकारिणी पुढील पाच वर्षासाठी वाढवून घेण्यासाठी 27 जानेवारी 2021, बुधवार रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असून त्याला कोणी विरोध करू नये म्हणून चॅरिटी कमिश्नर यांच्याकडे कॅव्हेट दाखल केले आहे,अशी माहिती पराग करंदीकर यांच्या लेखातून समोर आली आहे.
"सध्याच्या कार्यकारिणीने करोंनाचे निमित्त साधून आपल्याला थेट पाच वर्षे मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव बुधवारी होणार्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. त्याला कोणी हरकत घेऊ नये म्हणून धर्मादाय आयुक्ताकडे थेट कॅव्हेटही दाखल केला आहे."
-
पराग करंदीकर (महाराष्ट्र टाइम्स मधील लेख)
"सभेवर कोणी आमचे म्हणणे न ऐकता स्थगिती मिळवू नये, म्हणून आम्ही कैव्हेट दाखल केले आहे", असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे म्हणणे आहे.
कॅव्हेट म्हणजे काय ?
एखादे मॅटर दाखल झालेले नाही पण दाखल होऊ शकते व त्याच्याशी तुमचा संबंध असेल तर कोर्टाने तुमचे म्हणणे ऐकून न घेता एकही आदेश, स्थगिती इ. दिली जाऊ नये याकरिता तुमच्यातर्फे दाखल केला जाणारा अर्ज.
कॅव्हेटविषयीची अधिक माहिती दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ चे कलम १४८ (अ) व आदेश ४० (अ) नियम १ ते ७ यांत दिलेली आहे.