मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून मुंबई विद्यापीठावर डॉ. रामदास अत्राम यांच्या कुलसचिव पदावरील केलेल्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. कुलगुरुंनी नेमलेल्या डॉ. बळीराम गायकवाड यांना आजच पुन्हा कुलसचिव पदाची सुत्रे द्यावीत असेही मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले.
विद्यापीठ कायद्यातील कलम ८(५) द्वारे राज्य सरकारला असलेला अधिकार हा अपवादात्मक परिस्थितीमध्ये व कारणे देऊन वापरायचा आहे असेही उच्च न्यायालयाने म्हटले. ८ जाने. पत्रामध्ये असे कोणतेही सबळ कारण दिसत नाही. तसेच विद्यापीठ कायद्यातील कलम १४(५)अन्वये कुलगुरुंना जर कुलसचिवाची जागा रिक्त झाली असल्यास त्यावर योग्य व्यक्तीला ६ महिन्यासाठी प्रभारी कुलसचिव नियुक्त करता येतो. तसे मुंबई विद्यापीठात झाले आहे. त्यामुळे ८ जाने. शासननिर्णयाला स्थगिती दिली. राज्य सरकारने कारणे न देता विद्यापीठांवर कुलसचिव लादू शकत नाही हे यानिमित्ताने अधोरेखित झाले. तसेच मुंबई विद्यापीठामध्ये नियमित कुलसचिव भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितले.
सदर याचिका मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री. धनेश सावंत यांनी केली होती. उच्च न्यायालयातील न्या. एस.सी. गुप्ते व न्या. एस.पी. तावडे यांनी याचिकेची सुनावणी घेतली व निर्णय दिला.