काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी ह्यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नुकतेच एक भाषण केले. ह्या भाषणात ते म्हणाले की संविधान असे सांगते की भारत राष्ट्र नसून राज्यांचा संघ आहे. त्यांच्या ह्या विधानानंतर चर्चेला उधाण आले, अनेकांनी राहुल गांधींवर टीका केली. गांधींच्या ह्या वक्तव्याचा अर्थ असा होता की भारतातील राज्ये देखील केंद्रासारखीच सार्वभौम आहेत किंवा केंद्राला राज्यांपेक्षा जास्त अधिकार नाहीत. हे खरे आहे का आणि भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत सिंहाचा वाटा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ह्याविषयी काय मत होते, हे आपण ह्या लेखातून जाणून घेऊया
भारताच्या संविधानात अनुच्छेद एक नुसार भारत हा राज्यांचा संघ आहे. पण ह्याचा अर्थ खरोखर राहुल गांधी म्हणतात तसा आहे का? राज्ये केंद्र सरकार एवढीच शक्तिशाली आहेत का? ह्याचे उत्तर कोणताही घटनेचा अभ्यासक ‘नाही’ असेच देईल.
कारण भारताच्या संविधानात अशा अनेक तरतुदी आहेत ज्या केंद्र सरकारला राज्यांपेक्षा अधिक अधिकार देतात.
संविधानाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अनुच्छेद नवीन राज्ये तयार करणे, राज्यांच्या सीमा वाढवणे, कमी करणे, इत्यादी अनेक अधिकार संसदेला म्हणजेच केंद्रीय विधिमंडळाला देण्यात आलेले आहेत. म्हणजेच भारतीय संविधानाचा राज्यांचे सार्वभौमत्व अपेक्षित नाही. राज्यांकडून राज्याचा दर्जा काढून घेण्याचा अधिकार संसदेला आहे.
असेच आणीबाणीच्या प्रसंगी केंद्राकडे सर्वाधिकार, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे अधिकार, एक संविधान, एक नागरिकत्व, संपूर्ण देशात एकछत्री नागरी सेवा अशा तरतुदींमध्ये केंद्राला राज्यांपेक्षा अधिक अधिकार असल्याचे दिसते. भारत हा काही अमेरिकेसारखी हुबेहूब संघराज्य पद्धती असलेला देश नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी घटनेचा मसुदा घटनासमिती समोर प्रस्तुत करताना दिनांक ४ नोव्हेंबर १९४८ रोजी एक भाषण केले होते. ह्या भाषणात त्यांनी भारताला संविधानात राज्यांचा संघ का म्हंटले आहे ह्याचे उत्तर दिले आहे.
डॉ. आंबेडकर म्हणतात, “ महत्त्वाची गोष्ट ही की संविधानाच्या पहिल्या अनुच्छेदात संघ किंवा युनियन हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे. मसुदा समितीला हे स्पष्ट करायचे होते की भारत जरी संघराज्य असेल तरी ते वेगवेगळ्या राज्यांमधील करारातून अस्तित्वात आलेले नाही आणि राज्यांनी एकत्र येण्याच्या करारातून अस्तित्वात आलेले हे संघराज्य नसल्याने कोणत्याही राज्याला त्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. हे संघराज्य म्हणजे संघ किंवा युनियन आहे कारण ते अविनाशी आहे. व्यवस्थापनाच्या सोयीसाठी म्हणून जरी हा देश आणि लोक राज्यांमध्ये विभागलेले असले तरी हा देश एक एकसंध पूर्णत्व आहे, इथले लोक एकाच स्रोतापासून जन्माला आलेल्या एका साम्राज्याचे एक लोक आहेत. राज्यांना स्वतंत्र होण्याचा अधिकार मिळू नये आणि संघराज्य अविनाशी व्हावे यासाठी अमेरिकेत नागरी युद्ध घडावे लागले. त्यामुळे भविष्यात कुठल्याही तर्कवितर्कांना किंवा संघर्षाला वाव मिळू नये ह्यासाठी मसुदा समितीवर ही गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करावीशी वाटली.”
डॉ. आंबेडकरांच्या भाषणातील हा उतारा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतात राज्ये आली तरी ती केवळ व्यवस्थापकीय सोयीसाठी आहेत आणि देशाचे ऐक्यच सर्वात महत्त्वाचे आहे हे त्यांनी आपल्या ह्या भाषणातून स्पष्ट केलेले आहे. मूळ इंग्रजी भाषणातील हा उतारा इथे देत आहोत,
संविधानाची उद्देशिका काय म्हणते हे ही बघुया,
राहुल गांधी म्हणतात की भारत हे राष्ट्र नाही, पण संविधानाच्या preamble मध्ये राष्ट्राची एकता आणि एकात्मता ह्यांचा स्पष्ट उल्लेख आहे.
संविधानाचा अभ्यास केल्यास भारतात राष्ट्रीय एकात्मता ही राज्यांच्या अस्मितेपेक्षा कायमच महत्त्वाची राहिली आहे हे आपल्याला समजते.
#rahulgandhi #parliament #budgetsession #drambedkar #indiaunionofstates #constitution
https://youtube.com/shorts/rA1X2TsEedw?feature=share