बंगाल हिंसा : कलकत्ता उच्च न्यायालयाने खून आणि बलात्काराच्या प्रकरणांची चौकशी सीबीआय कडे सोपवली
 

कलकत्ता उच्च न्यायालयाने आज पश्चिम बंगाल राज्यातील निवडणूक निकालानंतर घडलेल्या खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यांची चौकशी सीबीआय कडे सोपवली.

 

२ मे रोजी पश्चिम बंगाल राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि राज्यात हिंसाचाराच्या असंख्य घटना घडत असल्याचे समोर आले होते. ह्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे खून झाल्याचा घटनाही उघडकीस आल्या होत्या. महिलांवर बलात्कार आणि अत्याचार होत असल्याचे देखील उघड झाले होते. ह्यानंतर अनिंद्य सुंदर दास तसेच इतर काही व्यक्ती आणि पीडितांना कलकत्ता उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

 

कलकत्ता उच्च न्यायालयाने राष्ट्रीय मानवहक्क आयोगाला ह्या प्रकरणांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. ह्या चौकशीतून हिंसाचाराचे दाहक वास्तव समोर आले होते. ममता बॅनर्जी ह्यांच्या तृणमूल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयी झाल्यावर विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर अनन्वित अत्याचार केल्याचे ह्या चौकशी अहवालातून उघड झाले होते.

     
#BengalViolence #PostPollViolence #CulcattaHighCourt #NationalHuman-rightsCommission
   

खून, बलात्कार आणि महिला अत्याचाराच्या प्रकरणांची चौकशी आजच्या आदेशाने सीबीआय कडे सोपवण्यात आली आहे. तर इतर गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी एक विशेष चौकशी पथक (SIT) नेमण्यात आली आहे. ही चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होईल. कोणीही ह्या चौकशीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याकडे गांभीर्याने बघितले जाईल असा इशाराही उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारच्या सर्व विभागांना ह्या चौकशीत सीबीआय आणि SIT ला सहकार्य करण्याचे निर्देश देखील कलकत्ता उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

सीबीआय आणि SIT द्वारे होणाऱ्या चौकशीचे अहवाल ६ आठवड्याच्या आत उच्च न्यायालयापुढे सादर करायचे आहेत.

 

महत्त्वाचे म्हणजे कलकत्ता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला सर्व पीडितांना त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

 

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी ह्यांच्या सरकारने राष्ट्रीय मानवहक्क आयोगाचा अहवाल पक्षपाती असल्याचा आरोप केला होता. परंतु हा आरोप उच्च न्यायालयाने मान्य केला नाही. तसेच आपण केवळ ह्या आयोगाच्या अहवालाच्या आधारे निकाल देत नसून आपल्यासमोरील इतर बाबी, युक्तिवाद आणि तथ्य लक्षात घेऊन हा निकाल देत असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

 

निकालपत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा

   

कलकत्ता उच्च न्यायालयाच्या ह्या निकालाने पीडितांना दिलासा मिळाला आहे मात्र ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा निकाल म्हणजे मोठी चपराक असल्याचे बोलले जात आहे.

 

बंगाल हिंसा: १७ वर्षीय आणि ६४ वर्षीय बलात्कार पीडित महिला सर्वोच्च न्यायालयात

बंगाल हिंसाचार: कलकत्ता उच्च न्यायालयाने मागितला अहवाल

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!