शिवसेना नेते एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा NIA च्या ताब्यात
 

शिवसेना नेते आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले मुंबईचे निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा ह्यांना राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA) ने ताब्यात घेतले आहे. फेब्रुवारी महिन्यात उद्योगपती मुकेश अंबानी ह्यांच्या Antilia ह्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी आणि मन्सुख हिरेन हत्या प्रकरणी ही कारवाई झाली आहे.

 

शर्मा ह्यांच्या अंधेरी पूर्व येथील निवासस्थानी आज ( गुरुवारी) सकाळी ६ वाजताच्या सुमारास NIA ने छापे टाकले. CRPF च्या पथकांसह NIA अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली.

ह्यापूर्वी ह्या प्रकरणी शर्मा ह्यांना NIA कडून चौकशी साठी पाचारण करण्यात आले होते. मृत्यूपूर्वी हिरेन ह्यांच्या मोबाईल वर आलेले व्हॉट्सॲप कॉल शर्मा ह्यांच्या अंधेरी येथील पत्त्यावरून आल्याचा संशय आहे. ह्या मृत्यूच्या कटात सचिन वाझे सह प्रदीप शर्माचा सहभाग असल्याचा NIA ला संशय आहे. १ ते ४ मार्च दरम्यान शर्मा आणि वाझे ह्यांची भेट झाल्याची माहिती NIA ला मिळाल्याचे समजते.

 

अंबानी ह्यांच्या घरासमोरील स्फोटके ज्या गाडीत ठेवलेली होती ती हिरेन ह्यांच्या मालकीची होती. त्यानंतर हिरेन ह्यांचा मृतदेह ठाण्याजवळ सापडला आणि ह्या प्रकरणाचा तपास NIA ने आपल्या हाती घेतला. ह्या प्रकरणी मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे , रियाझ काझी, संतोष माने ह्यांना अटक करण्यात आलेली आहे. ह्याच आठवड्यात संतोष शेलार आणि आनंद जाधव ह्या दोन संशयितांनाही अटक करण्यात आली आहे. शर्मा ह्यांना आज ताब्यात घेतले असून त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत.

 

प्रदीप शर्मा ह्यांनी २०१९ मध्ये पोलिस दलातून निवृत्ती घेत शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला होता. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती परंतु त्यांना यश आले नव्हते.

 

हे ही वाचा

मला सुरक्षित ठिकाणी ठेवा: सचिन वाझेची कोर्टाला मागणी

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!