फरार उद्योगपती निरव मोदी ह्याच्या हस्तांतरण प्रकरणात यूके मधील न्यायालयात निरव मोदीच्या बाजूने साक्ष देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे ह्यांची महाराष्ट्र सरकारने एका महत्त्वाच्या पदी नियुक्ती केली आहे.
२००५ साली राज्यात प्राणी कल्याण कायद्याचे संनियंत्रण करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. ह्या समितीचे अध्यक्षपद निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी ह्यांच्याकडे सोपवण्यात आले होते. परंतु २०१९ मध्ये त्यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त होते. ह्या पदावर आता निवृत्त न्या. अभय ठिपसे ह्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आजच एका शासन निर्णयाद्वारे ही नेमणूक जाहीर करण्यात आली.

ठिपसे ह्यांनी २०१९ मध्ये काँग्रेस पक्षात अधिकृतरित्या प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी निरव मोदी ह्याला भारताकडे सोपवण्यात येऊ नये असे मत इंग्लंड मधील कोर्टात तज्ञ साक्षीदार म्हणून मांडले होते. त्या कोर्टाने निरव मोदी विरुद्ध निकाल देताना ठिपसे ह्यांच्यावर कडक शब्दात टीका केली होती. आपली राजकीय ओळख, विचार लपवून तज्ञ साक्षीदार म्हणून कोर्टासमोर साक्ष दिल्याने ह्या कोर्टाने ठिपसे यांच्याविरुद्ध निरीक्षण नोंदवले होते.
ह्या साक्षीनंतर ठिपसे ह्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. त्यावर आपण केवळ तज्ञ साक्षीदार म्हणून आपले मत मांडायला गेलो होतो असे ठिपसे ह्यांनी आपल्या बाचावत म्हंटले होते.
आता ठिपसे ह्या प्राणी कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील.