राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याप्रकरणी ‛मुंबई सागा‘ च्या निर्मात्यांना नोटीस
 

१९ मार्च रोजी ऍमेझॉन प्राईम ह्या OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झालेल्या मुंबई सागा ह्या चित्रपटाच्या निर्मात्या दिग्दर्शकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बदनामी प्रकरणी नोटीस पाठवण्यात आले आहे.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबईतील स्वयंसेवक महेश भिंगार्डे ह्यांनी ह्या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक संजय गुप्ता आणि सर्व निर्मात्यांच्या नावे नोटीस पाठवली आहे.

 

जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत असलेला हा सिनेमा मुंबईतील नव्वद च्या दशकातील परिस्थितीवर आधारित आहे. गँगस्टर आणि पोलीस ह्यांच्यातील द्वंद्वाची कहाणी ह्यात दाखवण्यात आली आहे. सिनेमा सुरू होताना हा सिनेमा सत्यघटनांनी प्रेरित असल्याचे लिहून येते.

 

ह्या सिनेमातील एक दृश्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात असलेल्या व्यक्तींचा फोटो दाखवत त्यातील व्यक्ती एका भाऊ नामक व्यक्तिरेखेच्या सेनेचे सदस्य असल्याचे दाखवले आहे. ह्या सेनेतील व्यक्ती मुंबई पोलीस दलात घुसखोरी करून महत्वाची पदे काबीज करत आहेत आणि मुंबई पोलीस दलात ह्या भाऊ नामक व्यक्तिची स्वतंत्र सेना तयार होत आहे अशा आशयाची चर्चा ह्या दृश्यात केली जात आहे. ह्या दृश्यातून असे दाखवण्याचा जाणीवपूर्वक  प्रयत्न केल्याचे दिसते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे काही कारस्थान करत आहे. ह्या दृश्यामुळे संघाची प्रतिमा मलीन केली जात असून त्याने संघ स्वयंसेवकांच्या भावना दुखावल्या आहेत असे भिंगार्डे ह्यांचे म्हणणे आहे.

 

ह्या सिनेमातून हे बदनामीकारक दृश्य काढून टाकावे तसेच सर्व मानहानीकारक संवाद काढून टाकावे आणि वृत्तवाहिन्यांवरून जाहीर माफी मागावी, अन्यथा आपण कायदेशीर कारवाई करू असे ह्या नोटिशीत बजावण्यात आले आहे.

 

सदर नोटीस ऍड. प्रकाश साळसिंगीकर ह्यांच्या मार्फत पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!