आपल्याला मिळणाऱ्या धमक्यांची सीबीआयने चौकशी करावी ह्यासाठी परमवीर सिंह सर्वोच्च न्यायालयात
 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह ह्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. आपल्याला अनिल देशमुख ह्यांच्यावर केलेले आरोप मागे घ्यावे ह्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी अधिकाऱ्यांनीच धमक्या दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ह्या धमक्यांची सीबीआयने चौकशी करावी ह्यासाठी त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.

 

परमवीर सिंह ह्यांनी एक पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्यावर खंडणीखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआयकडे ह्या आरोपांची चौकशी सोपवण्यात आली. दरम्यान अनिल देशमुख ह्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. ह्यानंतर राज्य सरकारने परमवीर सिंह ह्यांच्याविरुद्ध नागरी सेवा नियमांचा भंग केल्याचे आरोप ठेवत विभागीय चौकशी सुरू केली. ह्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी अधिकाऱ्यांनी आपल्याला देशमुख ह्यांच्यावर केलेले आरोप मागे घेण्यासाठी धमकी दिली असे सिंह ह्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ह्या धमक्यांची सीबीआयने दाखल घ्यावी अशी मागणी त्यांनी ह्या याचिकेत केली आहे.

 

आपल्याविरुद्ध सुरू असलेली विभागीय चौकशी महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात हलवण्यात यावी अशीही त्यांची मागणी आहे. महाराष्ट्र सरकार राजकीय आकसातन आपल्यावर कारवाई करत असल्याने राज्यात आपली निष्पक्ष चौकशी होणार नाही असे त्यांना वाटते.

 

सिंह ह्यांच्यावर atrocity कायद्याखाली एक FIR देखील दाखल करण्यात आला आहे. त्याविरुद्ध त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असून तेथे राज्य सरकारने २० मे पर्यंत त्यांना अटक न करण्याचे कबूल केले आहे.

 

हे ही वाचा

परमवीर सिंह ह्यांची राज्य सरकारविरुद्ध नवीन याचिका

 

परमवीर सिंह ह्यांना तूर्तास अटक नाही: सरकारचे कोर्टात आश्वासन

One thought on “आपल्याला मिळणाऱ्या धमक्यांची सीबीआयने चौकशी करावी ह्यासाठी परमवीर सिंह सर्वोच्च न्यायालयात

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!