‘नारदा टेप्स’प्रकरणी तृणमुलचे चार नेते अटकेत
 

सीबीआयने केलेल्या कारवाईत दोन मंत्र्यांचाही समावेश; सुनावणी सुरू झाली आहे

   

पश्चिम बंगालमध्ये नारदा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने केलेल्या कारवाईत तृणमुलच्या चार नेत्यांना अटक करण्यात आली आहे. सुब्राता मुखर्जी, फिरहाद हकीम हे दोन मंत्री तर आमदार मदन मित्र आणि कोलकात्याचे माजी महापौर सोवान चॅटर्जी यांचा अटकेत असलेल्या नेत्यांमध्ये समावेश आहे.

 

आज चौघांनाही सीबीआयने virtual hearing द्वारे कोर्टासमोर हजर केल्याचे समजते. सुनावणी झाल्यावर सीबीआय कोठडीविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच सीबीआयने आरोपपत्र दाखल केले असल्याची माहिती समोर येते आहे. जर आरोपपत्र दाखल झाले असेल तर थेट खटला चालवला जाऊ शकतो.

   

तृणमुल कार्यकर्त्यांनी निझाम पॅलेस येथील सीबीआय कार्यालयावर दगडफेक सुरू केली आहे. राज्यपालांनी पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व कृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ममता बॅनर्जी स्वतः सीबीआय कार्यालयात गेल्या होत्या.

 

नारदा टेप्स मध्ये आहे काय?

 

नारदा स्टिंग ऑपरेशन मध्ये काही खासगी कंपन्यांना लाच घेऊन विशेष सवलती देण्याचा प्रकार पश्चिम बंगाल सरकारकडून करण्यात आल्याचा गौफ्यस्फोट करण्यात आला होता. ज्यामध्ये उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आणि टीमसीचे प्रमुख नेते लाच घेतानाचे पुरावे आढळल्याचा आरोप आहे.

मॅथ्यू सॅम्युएल यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले होते.

 

सॅम्युएल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक बनावट आधार कार्ड संतोष शंकरन या नावाने त्यांनी तयार केले होते. तसेच एका कंपनीचीदेखील स्थापना करण्यात आली.

 

एका टॅक्सी ड्रायव्हरच्या माध्यमातून त्यांची एका 'टायगर' नावाच्या इसमाशी भेट झाली. टायगर ने सॅम्युएल यांची भेट कोलकाताचे तत्कालीन उपमहापौर इकबाल अहमद आणि आयपीएस अधिकारी एस. एम. एच. मिर्झा यांच्याशी करून दिली.

 

त्यानंतर सुलतान अहमद (इकबाल यांचा भाऊ), सुब्रता मुखर्जी, फिरहाद हकीम आणि अपरूपा पोद्दार यांच्याशी संबंध आला. मिर्झा यांनी सॅम्युएल यांची ओळख मदन मित्रा आणि मुकुल रॉय यांच्याशी करून दिली. प्रत्येक भेटीतून त्यांचा नव्या माणसांशी परिचय होत होता. सॅम्युएल यांच्याच शब्दात सांगायचे तर, एखाद्या चैन रिऍक्शन सारखेच.

 

सॅम्युएल यांनी एकूण 52 तासाचे फुटेज गोळा केले आहे. त्यात अनेक तृणमुल नेते लाच स्वीकारताना दिसले असा आरोप करण्यात आला होता.

 

सॅम्युएल त्यावेळी 'तेहलका' नियतकालिकात काम करत होते. सॅम्युएल यांनी केलेले स्टिंग ऑपरेशन प्रसिद्ध करण्यात दिंरंगाई झाली होती.

 
error: Content is protected !!