Ab Initio म्हणजे काय? – लॅटिन न्यायसूत्रांचा मराठीत अर्थ
 

वेगवेगळे कायदे, न्यायालयांचे निर्णय वाचताना त्यात लॅटिन भाषेतले वाक्प्रचार आपण वाचले असतील. कायद्याचं शिक्षण घेताना आपल्याला असे लॅटिन भाषेतील कायद्याशी संबंधित काही वाक्प्रचार किंवा न्यायसूत्रे अभ्यासावी लागतात. ह्या न्यायसूत्रांचा अर्थ आपल्या मराठी भाषेत समजून घेण्यासाठी LawMarathi वर हे नवीन सदर आजपासून सुरू होत आहे.

 

मध्ययुगीन काळात युरोपात लॅटिन ही कायद्याची भाषा होती. आणि त्यामुळेच तिथल्या कायद्यात किंवा न्यायशास्त्रात वापरली जाणारी मूलभूत तत्व किंवा सूत्रे लॅटिन भाषेत आहे. भारताची न्यायव्यवस्था बऱ्याच अंशी इंग्रजांनी आणलेल्या कायदे आणि न्यायशास्त्रावर आधारलेली असल्यामुळे ही लॅटिन न्यायसूत्रे भारतीय कायदा आणि न्यायालयांमध्येही वापरली जातात. इंग्रजीत ह्यांना Legal Maxims/ Latin maxims असं म्हणतात.

 

Ab Initio

 

ह्या सदरातली आपली पहिली maxim आहे Ab Initio.

 

उच्चार - ॲब इनिशिऒ 

 

अर्थ

लॅटिन भाषेत Ab म्हणजे ‘पासून’ आणि initio म्हणजे ‘सुरुवात’. त्यामुळे Ab Initio चा अर्थ होतो सुरुवातीपासून.

Initio हे रूप inire ह्या क्रियापदापासून येतं. inire चा अर्थ होतो सुरू करणे. आपण Initiative, Initiation, Initiate असे शब्द वापरतो ते ह्याच मूळ लॅटिन क्रियापदापासून जन्माला आले आहेत.

 

कायद्यातील वापर

कायद्यात एखादी गोष्ट सुरुवातीपासून अशी आहे हे सांगताना ह्या वाक्प्रचाराचा वापर होतो. करार, लग्न, कायद्यातील प्रक्रिया हे सुरुवातीपासून शून्यवत असतील तर ते सांगण्यासाठी void ab initio हा शब्दप्रयोग वापरला जातो.

अल्पवयीन मुलांनी केलेले करार सुरुवातीपासूनच शून्यवत असतात हे सांगण्यासाठी ‘Agreements entered into by minors are void ab initio’ असं वाक्य वापरलेलं आपण वाचलं असेल. मोहरीबिबी वि. धर्मदास घोष ह्या प्रसिद्ध निकालात हे तत्त्व प्रस्थापित झालं

ह्या तत्वाचा अर्थ असा की, असे करार न्यायालयाने अवैध घोषित केल्याच्या क्षणी अवैध होत नाहीत तर ते मुळात सुरुवातीपासून ( Ab Initio ) कायद्याच्या दृष्टीने शून्य असतात, अस्तित्वातच आलेले नसतात.

 
चला तर मग, Ab Initio ची आणखी उदाहरणे शोधून काढा आणि ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. अशाच आणखी लॅटिन न्यायसूत्रांचा अर्थ समजून घेण्यासाठी LawMarathi ला सबस्क्राईब करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!