बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्या. जी.एस. कुलकर्णी ह्यांच्या खंडपीठासमोर कोरोना व्यवस्थापनासंबंधी दाखल याचिकेवर सुनावणी सुरू होती. ह्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने गुजरात मोडेलचे उदाहरण दिले.
पालघर येथील एका रुग्णालयाच्या दुर्दशेवर एका वृत्त वाहिनीने प्रकाश टाकला होता. त्याचा उल्लेख न्यायालयाने ह्या सुनावणीदरम्यान केला. “पालघर मुंबईच्या जवळ असून तिथल्या रुग्णालयाची बिकट अवस्था आहे; त्याकडे अजून लक्ष का दिले गेलेले नाही”, असा सवाल न्यायालयाने केला.
“राज्यातील ग्रामीण भागापर्यंत कोरोना पोहचू नये ह्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ग्रामीण भागात शहरांसारख्या सुविधा आपल्याकडे नाहीत. पहिल्या लाटेत ग्रामीण भागात फारसा फैलाव झालेला नव्हता. परंतु ह्यावेळी तसे नाही”, असे कोर्ट म्हणाले.
याचवेळी गुजरात मधील एका गावात तीन महिन्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याच्या वृत्ताचा न्यायालयाने उल्लेख केला. “हे गुजरात मॉडेल नेमके आहे तरी काय ह्याकडे लोक बघत आहेत. इच्छाशक्ती असल्यास हे साध्य करता येऊ शकते” असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना द्याव्या असेही उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान सांगितले.