कोरोना व्यवस्थापनासंबंधी एका याचिकेवर सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिवसेना मंत्री संदीपान भूमरे ह्यांचाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेना नेते आणि राज्याचे रोजगार हमी मंत्री संदीपान भूमरे ह्यांनी ५ मे रोजी आपल्या पैठण मतदार संघातील देवगाव येथे काही विकासकामांचे उद्घाटन केले होते. हे उद्घाटन समारंभ कोरोना संचारबंदीचे उल्लंघन करणारे असल्याचे आरोप झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्याने भुमरे ह्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.
आज सुनावणीदरम्यान न्यायालयाने भुमरे ह्यांच्या ह्या कोरोना नियमावली भंग करणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमांची दखल घेतली.
“ मुख्यमंत्र्यांनी राजकारण्यांना असे कार्यक्रम करू नका असे आवाहन केलेले असतानाही असे कार्यक्रम होत आहेत. हे मंत्री सुपर स्प्रेडर आहेत." असे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले. अजूनही ह्या मंत्र्यावर कारवाई झाली नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सदर प्रकरणाबद्दल दाखल झालेल्या FIR मध्ये आरोपींच्या नवांमधून मंत्र्याचे नाव वगळण्यात आले ह्याबद्दल न्यायालयाने पोलिस आणि राजकारण्यांचे साटेलोटे असल्याचे मत व्यक्त केले.
आभासी पद्धतीने कार्यक्रम करता येत असूनही मंत्र्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून असे कार्यक्रम करणे अयोग्य असल्याचे कोर्ट म्हणाले. तसेच कार्यक्रमाच्या फोटोंवरून मंत्री महोदयांच्या मास्क हनुवटीवर असल्याचे दिसते आहे असेही निरीक्षण कोर्टाने व्यक्त केले.
राज्यातील राजकारण्यांनी कोरोना काळात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत असे निर्देश देणार असल्याचे संकेत उच्च न्यायालयाने दिले आहेत.