सूड उगवण्यासाठी माझ्यावर कारवाई: रश्मी शुक्ला राज्य सरकारविरुद्ध उच्च न्यायालयात
 

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ह्यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करत महाराष्ट्र सरकारने त्यांच्याविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईला आव्हान दिले आहे.

 

नेमके प्रकरण काय?

मार्च महिन्यात महाराष्ट्रात मनसुख हिरेन हत्या प्रकरण बाहेर आले आणि त्यानंतर राज्यातील पोलिस दलात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले. ह्यात मुंबई पोलिसांच्या गुप्तहेर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला ह्यांनी केलेल्या एका चौकशीतील माहिती बाहेर आली होती. रश्मी शुक्ला ह्यांनी पोलिस महासंचालकांना एक अहवाल दिला होता. त्यात काही राजकीय व्यक्तींच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांविषयी संभाषणाच्या रेकॉर्ड केलेल्या टेप होत्या.

 

मुंबईचे पूर्व पोलीस महासंचालक परमवीर सिंह ह्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना रश्मी शुक्ला ह्यांच्या ह्या अहवालाचा हवाला दिला होता. ह्या अहवालातील काही माहिती विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ह्यांनी राज्यातील लोकांसमोर आणली होती.

 

ह्यानंतर बीकेसी सायबर पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध एक FIR दाखल केला. त्यांनी अनधिकृतरित्या फोन टॅप केले आणि काही गोपनीय दस्तावेज फोडल्याचा किंवा जाहीर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यावर Official Secrets Act आणि Telegraph Act, माहिती तंत्रज्ञान अधिनियम ह्या कायद्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ह्याच प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध BKC सायबर पोलिसांनी समन्स बजावले होते आणि शुक्ला ह्यांना चौकशीसाठी बोलवले होते. शुक्ला ह्या सध्या हैदराबाद येथे CRPF च्या अतिरिक्त संचालक पदावर आहेत. कोरोना परिस्थितीमुळे आपण चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही असे शुक्ला ह्यांनी मुंबई पोलिसांना कळवले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी २८ एप्रिल रोजी दुसरा समन्स बजावत शुक्ला ह्यांना ३ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

 

ह्या दोन्ही समन्स विरुद्ध रश्मी शुक्ला ह्यांनी ही रीट याचिका दाखल केली आहे. ही कारवाई बेकायदेशीर असून आपल्याला त्रास देण्यासाठी महाराष्ट्र सरकार हे करत आहे असे शुक्ला ह्यांनी याचिकेत म्हणले आहे.

 

ही कारवाई राजकीय सूड उगवण्यासाठी सुरू केली असल्याचे शुक्ला ह्याच्या याचिकेत म्हटले आहे. आपल्याविरुद्ध जारी केलेले समन्स बेकायदेशीर घोषित करून रद्द करावे अशी मागणी याचिकेत केली आहे.

 

ह्या याचिकेवर ६ मे रोजी सुनावणी होणार आहे.

 

ह्या दरम्यान रश्मी शुक्ला ह्यांनी अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय समोर आपला जबाब नोंदवला आहे.

One thought on “सूड उगवण्यासाठी माझ्यावर कारवाई: रश्मी शुक्ला राज्य सरकारविरुद्ध उच्च न्यायालयात

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!