इथून पुढे घराबाहेर पडताना सर्व व्यक्तींनी आधार कार्ड बाळगणे बंधनकारक असेल. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील कोरोना परिस्थिती बघता हा आदेश दिला आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या अखत्यारीत असलेल्या जिल्ह्यांना हा आदेश लागू राहील.
कोणत्या जिल्ह्यांना लागू?
- अहमदनगर
- औरंगाबाद
- बीड
- धुळे
- जालना
- जळगाव
- लातूर
- नांदेड
- उस्मानाबाद
- परभणी
- नंदुरबार
आज कोरोना व्यवस्थापन विषयावरील न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. ह्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
सोमवार ते शुक्रवार सकाळी ७-११ ही वेळ सोडून इतर कोणत्याही वेळी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपले आधार कार्ड जवळ ठेवायचे आहे. हा नियम डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील लागू आहे.
घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क लावलेला असणे सक्तीचे आहे. जर कोणी हे नियम पाळले नाहीत तर त्या व्यक्तीची RT -PCR टेस्ट केली जाईल तसेच त्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई केली जाईल.
ह्यावेळी कोर्टाने असेही आदेश दिले आहेत की जर कोणी आमदार, खासदार अथवा राजकीय नेत्याची ओळख सांगून, फोन लावून अशा कारवाईला विरोध करत असेल किंवा पोलिसांवर दबाव आणत असेल तर त्या व्यक्तीवर आणि दबाव आणणाऱ्या राजकीय नेत्यावरही पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला जाईल.
ह्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने मृत्यमुखी पडलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेतली. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना अंत्यविधीसाठी विद्युत दाहिनी उपलब्ध करून देण्याची सूचना ह्यावेळी न्यायालयाने केली.
ह्या याचिकेवर पुढील सुनावणी ३ मे रोजी होणार आहे.
हे ही वाचा,
एक खासदार तुमच्या नाकाखालून रेमडेसिविर आणतातच कसे? : उच्च न्यायालय