सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहन एम. शांतनगौडार ह्यांचे निधन

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहन एम. शांतनगौडार ह्यांचे शनिवारी रात्री गुरूग्राम येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. ते दीर्घ काळ कर्करोगाशी झुंज देत होते. त्यातच त्यांना व्हायरल न्युमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.

 

न्या. शांतनगौडार ह्यांची १७ फेब्रुवारी २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी ते केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते.

 

१९८० साली सनद प्राप्त करून न्या. शांतनगौडार ह्यांनी आपल्या वकिली व्यवसायाची सुरुवात केली. काही काळ धारवाड आणि नंतर बंगळूर येथे त्यांनी वकिली केली. १९८४ पासून ते स्वतंत्रपणे दिवाणी, फौजदारी आणि संविधान संबंधी प्रकरणे हाताळू लागले.

 

वकिली करतानाच त्यांनी काही महत्त्वाची पदे भूषविली. ते १९९१-९३ ह्या काळात कर्नाटक बार काऊन्सिलचे उपाध्यक्ष होते. १९९५-९६ मध्ये त्यांनी ह्या बार काऊन्सिलचे अध्यक्षपद देखील भूषविले.

 

कर्नाटक उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून २००३ साली त्यांची नियुक्ती झाली आणि पुढे २००४ साली त्यांची स्थायी न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.

 

त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ही सर्व पदे भूषवताना आपल्या  कर्तव्याप्रती कायम निष्ठा दाखवली.

 

त्यांच्या निधनाने न्यायविश्र्व हळहळले आहे. माननीय राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद ह्यांनीही आपल्या ट्विटद्वारे न्या. शांतनगौडार ह्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांच्या जाण्याने विधीविश्वात पोकळी निर्माण झाली असल्याचे म्हंटले आहे.

   

LawMarathi परिवारातर्फे न्या. शांतनगौडार ह्यांना विनम्र श्रद्धांजली!

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!