देशमुख प्रकरण: सीबीआयच्या FIR मध्ये लिहिलंय काय?
 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शंभर कोटी वसुलीप्रकरणातील आरोपी अनिल देशमुख यांच्याविरोधात शनिवारी सकाळी सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआर मध्ये काय लिहिलंय, कुणाकुणाची नावे लिहिण्यात आली आहेत, हे समजून घेऊया.

 

नाव देशमुखांचे ; इतर सर्व 'अज्ञात'

 

सीबीआयने याप्रकरणी लिहिलेल्या एफआयआरमध्ये आरोपी म्हणून अनिल देशमुख यांचे नाव आहे. देशमुखांसह 'इतर अज्ञात' असा उल्लेख आहे. म्हणजेच अनिल देशमुख आरोपी आहेत, हे एफआयआर मध्ये स्पष्ट लिहिण्यात आले आहे. त्यामुळे देशमुखांना सीबीआयकडून कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. त्याशिवाय इतर अज्ञात आरोपी कोण असतील हे सीबीआय तपासात उघड होईल. त्यामुळे यात कितीही लोकांचा समावेश असला तरी सीबीआय त्यांची चौकशी करू शकेल.

 

परमबीर सिंह ठरले 'व्हीसलब्लोअर' ?

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांनी सचिन वाझेला दरमहा शंभर कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप केला होता. त्यावरून सुरू झालेल्या कोर्टकचेरी नंतर देशमुखांच्या विरोधात सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले. पण जयश्री पाटील यांनी परमबीर यांच्याविरोधातही तक्रार केली होती. सीबीआयने परमबीर सिंह यांचे नाव आरोपी म्हणून लिहिलेले नाही.

 

कोणत्या कलमाखाली एफआयआर?

 

भ्रष्ट्राचार प्रतिबंधक कायदा, १९८८ कलम ७ तसेच भारतीय दंडविधान संहिता, १८६० च्या कलम 120B नुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भ्रष्ट्राचार प्रतिबंधक कायदा कलम ७ नुसार कोणत्याही लोकसेवक (Public Servent) ने लाच घेणे किंवा लाच घेण्याचा प्रयत्न करणे गुन्हा आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असल्यामुळे ते Public servent ठरतात. तर भारतीय दंडविधान संहिता म्हणजेच IPC section 120B  गुन्हेगारी स्वरूपाचा कट याकरिताचे कलम आहे. एकापेक्षा जास्त लोकांनी ठरवून केलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत हे कलम लिहिले जाते.  IPC 120B मुळे स्वतः देशमुख तसेच त्यांच्यासोबत सामील असलेल्या सर्वांना शिक्षेसाठी समानरित्या जबाबदार धरले जाऊ शकते.

 

कोण आहेत तक्रारदार?

 

सीबीआयला प्राथमिक चौकशी करून पुढील कारवाईविषयी निर्णय करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार सीबीआयने प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे हा एफआयआर लिहिला आहे. तसेच सीबीआयचे अधिकारी स्वतः या प्रकरणी तक्रारदार आहेत. त्यांचे नाव श्री. आर एस गुंजीयाल असून ते DSP या पदावर आहेत.

 

कोण करणार प्रकरणाचा तपास?

 

किरण एस. , आयपीएस अधिकारी यांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. ते सीबीआयच्या अँटी करप्शन -५ या विभागाचे अधीक्षक आहेत तर या गुन्ह्याचा तपास श्री. महेश कुमार करतील. महेश कुमार सीबीआयमध्ये डीएसपी पदावर कार्यरत आहेत.

ह्या विषयातले आमचे हे रिपोर्ट वाचले का?

 

परमवीर सिंह V/S अनिल देशमुख: सीबीआय चौकशीचे न्यायालयाचे आदेश

 

अनिल देशमुखांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

   

अनिल देशमुख ह्यांना सीबीआय कडून समन्स

 

3 thoughts on “देशमुख प्रकरण: सीबीआयच्या FIR मध्ये लिहिलंय काय?

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!