न्या. रमणा – शेतकऱ्याचा मुलगा ते देशाचे सरन्यायाधीश
 

आज देशाचे मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे निवृत्त झाले. त्यानंतर न्या. एन. व्ही. रमणा हे सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील. सरन्यायाधीश हे पद भारतीय संविधानाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. या पदावर आता एन. व्ही. रमणा यांच्या निमित्ताने एक शेतकऱ्याचा मुलगा विराजमान होणार आहे. त्यासोबतच रमणा यांचे आयुष्य अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेले आहे. अशी बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करू आमच्या या विशेष लेखातून.

   

छोट्या गावातुन आलेले, गरीब कुटुंबात जन्म

 

न्या. रमणा यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात पुनवरम या गावी झाला. रमणा शेतकरी कुटुंबातुन आहेत. अस म्हणतात की, न्या. रमणा यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. मोठ्या शहरात राहिलेले, भरपूर पैसे खर्च करून विदेशात शिकले, असे काही रमणा यांच्या बाबतीत घडलेले नाही.

 

विद्यार्थी कार्यकर्ता, पत्रकार ते वकील

 

न्या. रमणा विद्यार्थीदशेत सक्रिय सामाजिक कार्यकर्ता होते. अस म्हणतात की, इंदिरा गांधींनी १९७५ साली लावलेल्या आणीबाणीविरोधात न्या. रमणा यांनी सत्याग्रह केला होता. न्या. रमणा यांनी एका तेलगु वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कामही केले होते. त्यानंतर न्या. रमणा यांनी वकिली सुरू केली.

 

कोणतीही वकिली पार्श्वभूमी नाही

 

न्या. रमणा एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आले. त्यामुळे त्यांना रूढार्थाने वकिली पार्श्वभूमी नाही. आपण अनेकदा ऐकले असेल की घरात कोणी वकील असले तर वकिली क्षेत्रात करिअर सोपं असतं. किंबहुना देशातील अनेक न्यायाधीश, नामवंत वकील कौटुंबिक वकिलीची पार्श्वभूमी असलेले आहेत. जसे की, न्या. धनंजय चंद्रचूड यांचे वडील सर्वोच्च न्यायालयातच न्यायाधीश होते. परंतु जे काही मोजके अपवाद असतात.  त्यापैकी एक न्या. रमणा आहेत.

 

प्रथितयश वकील

 

वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर न्या. रमणा यांची १० फेब्रुवारी १९८३ रोजी वकील म्हणून नोंदणी झाली. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय, केंद्रीय तसेच आंध्रप्रदेश अडमिनिस्ट्रीटेटिव्ह ट्रॅब्युनल आणि सर्वोच्च न्यायालयात यशस्वी वकीली करिअर घडवले. संविधान, दिवाणी, फौजदारी तसेच आंतरराज्य नदी विवादाचे कायदे या विषयांचे रमणा तज्ञ आहेत. आंध्रप्रदेशचे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

     
Tirupati Balaji justice Ramana
न्या. रमणा ह्यांनी सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाल्यावर आपल्या पत्नीसह तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले त्यावेळचे क्षणचित्र
 

न्यायाधीश

 

२७ जून २००० रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून रमणा यांची नियुक्ती झाली. १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ न्या. रमणा आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. २ मे २०१३ रोजी रमणा यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवड केल्याचे जाहीर झाले. २०१३ पासून एन. व्ही. रमणा सर्वोच्च न्यायालयात न्यायदान करीत आहेत. आता रमणा आज २४ एप्रिल २०२१ पासून देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेत आहेत. त्यांची वाटचाल सर्वच सामान्य कुटुंबातून येणाऱ्या वकिलांसाठी प्रेरणादायी आहे.

   

हे वाचले का?

 

नवनियुक्त सरन्यायाधीश रामण्णा ह्यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन

     

One thought on “न्या. रमणा – शेतकऱ्याचा मुलगा ते देशाचे सरन्यायाधीश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!