कलम १४४ नेमके आहे तरी काय? संचारबंदी की जमावबंदी? वाचा

काल ( मंगळवारी ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी महाराष्ट्रात १ मे पर्यंत कलम १४४ लागू असेल अशी घोषणा केली.

तेव्हापासूनच अनेकांना प्रश्न पडला आहे की हे कलम १४४ म्हणजे नेमके काय? ह्या कलमाखाली जमावबंदी लागते की संचारबंदी. ह्याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

 

काय आहे कलम १४४?

 

राज्यात लागू असलेले कलम १४४ हे फौजदारी प्रक्रिया संहितेतील ( Code of Criminal Procedure) कलम आहे.

ह्या कलमाखाली प्रशासनाला एखादे संकट किंवा उपद्रव टाळण्यासाठी काही तातडीचे उपाय करण्याचे अधिकार दिलेले आहेत.

हे अधिकार जिल्हा दंडाधिकारी ( district magistrate ) , उप विभागीय दंडाधिकारी ( sub divisional magistrate) किंवा राज्य सरकारने अधिकार दिलेल्या कोणत्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्याला दिलेले आहेत.

 

तातडीचे उपाय काय असू शकतात?

प्रशासन ह्या कलमाखाली कोणत्याही एका व्यक्तीला किंवा एखाद्या प्रदेशात राहणाऱ्या सर्व लोकांच्या नावे आदेश काढू शकते. हे आदेश त्या व्यक्तींना कुठलीही क्रिया करण्यास प्रतिबंध करू शकते. म्हणजेच हे आदेश लोकांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास व जमण्यस प्रतिबंध करणारे असू शकतात.

साधारण सर्वांचा समज असतो की कलम १४४ जमावबंदी साठी लागू करतात. पण हे कलम संचारबंदी साठी सुद्धा लागू केले जाते. ह्या कलमाद्वारे एखाद्या ठिकाणच्या सर्व व्यक्तींना व्यवसाय बंद ठेवण्यास सांगितले जाऊ शकते, त्यांच्या मालमत्ते संबंधी काही करण्यास सांगितले जाऊ शकते.

हे कलम लोकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यासाठी वापरले जाते. ज्याला curfew असे म्हणतात. ह्या कलमाखाली जमावबंदी म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा अधिक लोक जामन्यास मनाई करण्यात येऊ शकते. ह्या कलमाखाली इंटरनेट वापरावर बंदी घातली जाऊ शकते ( ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये तसे करण्यात लस होते).

 

म्हणजेच कलम १४४ खाली प्रशासनाला अनेक उपाय करण्याचे अधिकार मिळतात. त्यात जमावबंदी, संचारबंदी, इंटरनेट किंवा इतर माध्यमांच्या वापर - प्रसरणावर बंदी, शस्त्रास्त्र सरकारजमा करण्याचे आदेश असे काही उपाय असू शकतात.

 

हे कलम कोणत्या कारणांसाठी लागू करता येते?

१. एखाद्या व्यक्तीच्या जीविताला धोका असल्यास

२. सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी

३. आरोग्य आणि सुरक्षेसाठी

४. दंगल, दंगे रोखण्यासाठी

५. एखाद्या कायदेशीररीत्या कार्य करत असलेल्या व्यक्तीला अडसर, अडथळा निर्माण होत असल्यास

 

कलम १४४ किती दिवसांसाठी लागू करता येते?

हे कलम नागरिकांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध घालणारे असल्यामुळे ते फक्त मर्यादित काळासाठी लागू करता येते. एका वेळी दोन महिन्यांसाठी ते लागू केले जाऊ शकते. परंतु राज्य सरकारला गरजेचे वाटल्यास ते आणखी २ महिने वाढवता येते. परंतु कुठल्याही परिस्थितीत सलग  ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ हे कलम लागू राहू शकत नाही.

 

मग आत्ता महाराष्ट्रात नेमके काय निर्बंध आहेत?

काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार आता १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी दोन्हीही लागू आहे. अत्यावश्यक सेवा व काही इतर सूट देण्यात आलेल्या सेवा - उद्योग वगळता इतर कुठलाही उद्योग चालू ठेवण्यास मनाई आहे. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणारे किंवा त्यांचा लाभ घेण्यासाठी जाणारे लोकच सार्वजनिक ठिकाणी संचार करू शकतात. बाकी कुठल्याच कारणासाठी बाहेर फिरण्याची राज्यात कोणालाही परवानगी नसेल.

हे निर्बंध सविस्तर वाचण्यासाठी हे वाचा,

महाराष्ट्रात १ मे पर्यंत संचारबंदी; काय चालू, काय बंद राहणार? वाचा

 

One thought on “कलम १४४ नेमके आहे तरी काय? संचारबंदी की जमावबंदी? वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!