अनिल देशमुखांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

आज अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकार ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा आव्हान देण्यासाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

 

परमवीर सिंह ह्यांनी अनिल देशमुख ह्यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सीबीआय कडे सोपवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने केला होता. त्याला आव्हान देणाऱ्या देशमुख व राज्य सरकार ह्या दोन्हींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहेत.

 
हे प्रकरण जनतेच्या विश्वासाशी संबंधित आहे. ह्यातील आरोप आणि ह्यात गुंतलेल्या व्यक्ती बघता, स्वतंत्र चौकशी गरजेची आहे. त्यामुळे आम्ही ह्यात हस्तक्षेप करणार नाही आणि उच्च न्यायालयाचा निर्णय बदलणार नाही असे कोर्टाने स्पष्ट केले.
 

न्या. एस के कौल आणि न्या हेमंत गुप्ता ह्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. अनिल देशमुखांची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल ह्यांनी मांडली. राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी होते. मुंबई उच्च न्यायालयात याचिका करणाऱ्या डॉ जयश्री पाटील यांच्यासाठी ज्येष्ठ वकील हरीश साळवे बाजू मांडायला हजर होते.

 

देशमुखांच्या वतीने युक्तिवाद करताना उच्च न्यायालयाने आपली बाजू ऐकून न घेताच निर्णय केल्याचे सिब्बल म्हणाले. आपण आरोपी किंवा संशयित नाही, तरी आपली बाजू ऐकून न घेता आपल्यावर केवळ आरोप झाले म्हणून सीबीआय चौकशी लादता येऊ शकत नाही. ह्यामागे कोणतेही कायदेशीर तत्व नाही असा युक्तिवाद सिबल ह्यांनी केला. परंतु प्रकरण गंभीर असल्याचे कोर्टाने नोंदवले आणि त्यात गुंतलेल्या व्यक्तीही उच्चपदस्थ असल्याचे लक्षात घेऊन कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

One thought on “अनिल देशमुखांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!