सचिन वाझेचे कोर्टाला पत्र: आता काय होणार? वाचा
 

मनसुख हिरेन हत्या आणि Antilia स्फोटके प्रकरणी NIA च्या ताब्यात असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे ह्याने आज विशेष NIA न्यायालयात एक हस्तलिखित पात्र देऊ केले. ह्या पत्रात त्याने शरद पवार, अनिल देशमुख, अनिल परब अशा बड्या नेत्यांचा उल्लेख केला आहे.

 

आज वाझेच्या NIA कोठडी संदर्भात मुंबईतील विशेष NIA कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी वाझेने कस्टडीत राहणेच आपल्या हिताचे आहे असे म्हणत NIA च्या मागणीला विरोध केला नाही.

 
ह्या सुनावणी दरम्यान वाझेने कोर्टाला एक पत्र देऊ केले. कोर्टाने हे पत्र दाखल करून घेण्यास नकार दिला. आपण योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळत हे दाखल करावे अशी सूचना कोर्टाने केली.
     

त्यामुळे आता वाझे आपली भूमिका मांडणारे हे पत्र प्रतिज्ञापत्र ( affidavit )  म्हणून दाखल करू शकतो.  त्याचे हे म्हणणे न्यायदंडाधिकारी उपस्थित असताना शपथेवर लिहून घेतले तर ते फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ खाली येईल. तसे म्हणणे किंवा जबाब खटल्याच्या वेळी सत्यासत्यता पडताळण्यासाठी न्यायालयासमोर येईल.

 
वाझेने केलेल्या ह्या दाव्यांच्या आधारे आता NIA शरद पवार, अनिल देशमुख, अनिल परब आणि त्या पत्रात उल्लेख असलेल्या सर्वच व्यक्तींना चौकशीसाठी बोलवू शकते आणि गरज पडल्यास ताब्यात घेऊ शकते.
 

मुख्य म्हणजे ह्या पत्रात केलेले दावे आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह ह्यांच्या जनहित याचिका आणि पत्रातील दावे एकमेकांना दुजोरा देणारे आहेत. त्यामुळे सीबीआय देखील सिंह ह्यांच्या आरोपांची चौकशी करताना वाझेच्या पत्राची दखल घेईल. कोर्टात हे आरोप सिद्ध करताना ह्या दोन पत्रात असलेले समान उल्लेख एकमेकांना बळकटी देऊ शकतात.

 

वाझेच्या ह्या पत्रातील दावे इतर परिस्थितीजन्य पुराव्यानिशी सिद्ध झाले तर भविष्यात अनिल देशमुख आणि अनिल परब ह्यांना न्यायालय दोषी ठरवत शिक्षा देखील सूनवू शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!