परमवीर सिंह V/S अनिल देशमुख: सीबीआय चौकशीचे न्यायालयाचे आदेश
 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह ह्यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आज आपला निर्णय जाहीर केला. सिंह ह्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सीबीआय कडून प्राथमिक चौकशी केली जावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

 

सीबीआय कडून १५ दिवसात प्राथमिक चौकशी पूर्ण केली जावी आणि त्यातून जे बाहेर येईल त्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सीबीआय ने करावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

 

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्या. जी.एस. कुलकर्णी ह्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना महाराष्ट्र पोलिस ह्या प्रकरणाची तटस्थ चौकशी करू शकत नाहीत आणि त्यामुळे सत्य बाहेर यावे ह्यासाठी ही चौकशी सीबीआय कडे सोपवणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

 

परमवीर सिंह ह्यांच्या याचिकेबरोबरच ऍड जयश्री पाटील , CA मोहन भिडे आणि उपाध्याय ह्यांच्याही याचिका न्यायालयाने एकत्र ऐकल्या. ह्या याचिकांमध्ये सिंह ह्यांच्या गृहमंत्री देशमुखांवरील आरोपांची केंद्रीय एजन्सी कडून स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती.

 

ह्या निर्णयामुळे आता अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. त्यांना सीबीआय तर्फे चौकशीसाठी अटक होणार की काय असाही प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.

error: Content is protected !!