३० जानेवारी २०२१ रोजी एल्गार परिषदेत केलेल्या भाषणावरून झालेली FIR रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका शार्जील उस्मानी ह्याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
पुण्यात निवृत्त न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील ह्यांनी ह्या वर्षी एल्गार परिषद आयोजित केली होती. भिमा कोरेगाव येथे २ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीमागे एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणे असल्याने ही परिषद आधीच वादाच्या भोवऱ्यात होती. तरीही पुन्हा ह्या परिषदेचे आयोजन पुण्यात ३० जानेवारी २०२१ रोजी करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमात अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी चा विद्यार्थी नेता शार्जील उस्मानी ह्याला वक्ता म्हणून निमंत्रण होते.
शार्जील ह्याने ह्या कार्यक्रमात उपस्थित राहून भाषण केले. ह्या भाषणात त्याने ' आजचा हिंदू समाज सडला आहे ' असे वक्तव्य केले. ह्या वक्तव्यानंतर देशभरातून त्याच्यावर चांगलीच टीका झाली. ह्या भाषणात त्याने हिंदुंविषयी बरीच आक्षेपार्ह वक्तव्ये केली. त्यामुळे पुण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. २ दिवसांनंतर पोलिसांनी ह्या प्रकरणात FIR दाखल केली. ह्या FIR विषयी सविस्तर माहितीसाठी आमचा हा रिपोर्ट वाचा, हिंदूंचा अवमान करणाऱ्या शरजिलविरोधात FIR
शार्जील ह्याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही. आता शार्जील ने आपल्यावरील FIR रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
आपण केवळ समाजात अस्तित्वात असलेल्या समस्या दाखवून दिल्या आणि त्यावर उपाय देखील सांगितले. तसेच आपल्या भाषणानंतर कोणताही हिंसाचार घडला नाही. आपल्यावरील आरोप तथ्यहीन असून आपण केवळ आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करत ह्या शांततापूर्ण कार्यक्रमात भाग घेतला, असे ह्या याचिकेत शार्जील ने म्हंटले आहे.
ह्या याचिकेवर सुनावणी कधी होते आणि त्यात काय होते हे लवकरच कळेल. तोपर्यंत पुणे पोलिस शार्जील ला अटक करणार का, हाच प्रश्न आता चर्चेत आहे.