नवऱ्याशी भांडण झाल्यामुळे राजीनामा देणाऱ्या नगरसेविकेला कोर्टाचा दणका
 

मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात भिवंडी महानगरपालिकेच्या नगरसेविका फरझाना इस्माईल रंगरेझ ह्यांची एक याचिका फेटाळून लावली.

 
काय होती याचिका?
 

फरझाना ह्या भिवंडीत काँग्रेस पक्षाकडून २०१२ आणि २०१७ च्या महापालिका निवडणुकीत निवडून येऊन नगरसेविका झाल्या. त्यांनी २६ ऑक्टोबर २०२० रोजी पालिका आयुक्तांना आपल्या राजीनाम्याचे पात्र पाठवले. आपण आपल्या मर्जीने, कोणत्याही दबावाला बळी न पडता राजीनामा देत असल्याचे त्यांनी ह्या पत्रात लिहिले. आयुक्तांनी त्यांचा राजीनामा स्वीकारून राज्य निवडणूक आयोगाला ही माहिती दिली.

 

मात्र ३ नोव्हेंबर २०२० रोजी फरझाना ह्यांनी आयुक्तांना एक पत्र पाठवत आपण आपला राजीनामा मागे घेत असल्याचे कळवले. ह्या पत्राची माहिती आयुक्तांनी निवडणूक आयोगाला दिली नाही आणि आयोगाने रिक्त पदासाठी पुन्हा निवडणूक घेण्याचे ठरवले.

 
ह्या निर्णयाविरुद्ध सदर नगरसेविका मुंबई उच्च न्यायालयात गेल्या. आपले आपल्या नवऱ्याशी भांडण झाल्याने आपण रागात होतो आणि ह्या रागाच्या भरात हा राजीनामा दिला असे त्यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. त्यांच्या ह्या युक्तिवादाने सगळेच थक्क झाले.
 

एकदा नगरसेविकेने राजीनामा दिला की ते पद लगेच रिक्त होते. नंतर राजीनामा मागे घेण्याची तरतूद कायद्यात नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. रागात आणि डिप्रेशन मध्ये असल्याने राजीनामा दिला हे कारण तो राजीनामा मागे घेण्यास पुरेसे नाही, कायदा ह्याला मान्यता देत नाही, आयुक्तांनी केलेली कार्यवाही कायद्याला धरुनच आहे, असेही ह्यावेळी कोर्टाने नोंदवले.

 

ही याचिका कोर्टाने फेटाळून लावल्याने फरझाना ह्यांचे नगरसेविका पद त्यांना परत मिळण्याची शक्यता संपुष्टात अली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!