उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ ह्यांचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
सी आर जया सुकीन नावाच्या एका वकिलाने ही जनहित याचिका दाखल केली होती. उत्तर प्रदेश राज्यात गुन्हेगारी वाढली असून अनेकांना मारले जात आहे असे ह्या याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. देशातील गुन्ह्यांच्या ३०% गुन्हे उत्तर प्रदेशात होत आहेत असा दावा ही याचिकेत केला होता.
' तुम्ही इतर राज्यांचे गुन्हेगारी रेकॉर्डस् अभ्यासले का?' असा सवाल कोर्टाने याचिकाकर्त्याला केला. परंतु याचिकाकर्त्याचे म्हणणे निराधार असल्याचे कोर्टाला दिसले.
ह्या विषयात आता आणखी युक्तिवाद करत राहिलात तर जबर दंड करू असेही ह्या याचिकाकर्त्याला सुप्रीम कोर्टाने सुनावले.
जनहित याचिकेच्या नावाखाली प्रसिद्धीसाठी याचिका दाखल केल्या जाण्यावर सुप्रीम कोर्ट आणि न्यायविश्वातील अनेकांकडून वेळोवेळी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.