मुनव्वर फारुकी च्या सुटकेसाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी केला फोन
 

हिंदू देवतांचा अपमान केल्याबद्दल कॉमेडियन मुनव्वर फारुकी ह्याला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली होती आणि तो २ जानेवारी पासून इंदोर च्या मध्यवर्ती तुरुंगात होता. ५ फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. परंतु ५ तारखेला रात्रीपर्यंत कोर्टाचा निकाल न मिळाल्याने तुरुंग अधीक्षकांनी फारुकी ला सोडले नव्हते. रात्री उशिरा खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी इंदोर च्या चीफ मॅजिस्ट्रेटना फोन करून फारुकी ची सुटका करण्यास सांगितले.

 

'इंडियन एक्स्प्रेस' ह्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इंदोर मध्यवर्ती तुरुंग अधीक्षकांनी ही माहिती दिली.

 

सुप्रीम कोर्टाने ५ फेब्रुवारी रोजी दिलेला निकाल आपल्यापर्यंत पोहोचला नव्हता त्यामुळे आपण त्यावर कारवाई केली नव्हती. परंतु न्यायमूर्तींनी स्वतः फोन करून सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईट वर निकाल अपलोड झाला असेल असे सांगत कारवाई करायला सांगितले. ह्यानंतर फारुकी ला ५०,००० रुपयांच्या बाँड वर तुरुंगातून सोडण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली.

 

फारुकी ह्याने आपल्या स्टँड उप कॉमेडी शो मध्ये हिंदू देवी देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप होता. त्याला २ जानेवारी ला अटक करण्यात आली होती. त्याचा जामीन मध्य प्रदेश हाय कोर्टाने फेटाळून लावला होता

 

त्यानंतर फारुकी ने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने फारुकी चा जामीन अर्ज मंजूर केला होता

 

कोर्टाची ऑर्डर हातात मिळेपर्यंत अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना तुरुंगातून सोडले जात नाही. केवळ बातम्यांमध्ये कोर्टाच्या निकालाविषयी वाचून अधिकारी कारवाई करत नाहीत, त्यांना प्रत्यक्ष निर्णय हातात मिळायला लागतो. असे असतानाही फारुकी च्या सुटकेसाठी थेट सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी फोन करणे ही बाब सगळ्यांनाच आश्चर्याची वाटणारी आहे. हे न्यायमूर्ती नेमके कोण होते, ह्याचाही अजून उलगडा झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!